Crop Damage नैसर्गिक आपत्तीमुळे चार वर्षांपूर्वी झालेल्या शेतीपिकांच्या नुकसान भरपाई वितरणाचा मुद्दा अखेर निकाली निघाला आहे. यामुळे भरपाईसाठी ताटकळत बसलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०६ कोटी रुपये लवकरच वितरित केले जातील, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.
राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे २०२० मध्ये शेतीचे नुकसान झाले होते. मात्र, शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नव्हती. त्यानंतर राज्याच्या काही भागात सलग २०२१ व २०२२ मध्येही पिकांचे नुकसान झाले होते. याच काळात कोविड साथीचा प्रादुर्भाव झालेला होता. त्यामुळे भरपाईचे प्रस्ताव धूळ खात पडले होते. Crop Damage
पुण्यासह राज्यातील इतर विभागाच्या महसूल आयुक्तांनी त्याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा चालू ठेवला होता. ही समस्या निकाली काढण्यासाठी मुख्य सचिवांनी नैसर्गिक आपत्ती संदर्भातील राज्य कार्यकारी समितीची बैठकदेखील घेतली होती.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी दोन नोव्हेंबरला बैठक झाल्यानंतर शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी मान्यता दिली होती. परंतु, शासनाकडून अंतिम आदेश काढला जात नव्हता. अखेर महसूल विभागाचे उपसचिव संजय धारूरकर यांनी बुधवारी (ता. २१) मदत मंजुरीचे आदेश जारी केले.
१०६ कोटी रुपयांचे वितरण नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांना केले जात आहे, हे पाहण्याची जबाबदारी शासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली आहे. “कोणत्या व्यक्तीला किती नुकसानभरपाई दिली याचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करा,” अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.