Farmer Anudan कोल्हापूर जिल्ह्यातील १४ हजार ८०० शेतकऱ्यांचे पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे आदेश आज सोमवार (दि.२६) निघणार आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून तांत्रिक कारणास्तव अडकून पडले प्रोत्साहनपर अनुदान वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
करवीर निवासिनी आई अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचेही ४० कोटी कोल्हापूर महापालिकेला वर्ग केले असल्याची माहिती पालकमंत्री मुश्रीफ यांनी आज दिली. Farmer Anudan
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी या दोन्ही गोष्टींची पूर्तता करून दिली जाईल, अशी ग्वाही कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर दिली होती. त्या शब्दाची ही वचनपूर्ती केल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.
पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या आदेशावर सह्या झाल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाविकास आघाडीमध्ये अर्थमंत्री असताना त्यांनी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ४५ कोटी रुपयांची घोषणा केली होती. त्यापैकी पाच कोटी रुपयांचा निधी आला होता, ४० कोटी रुपयांचा निधी राहिला होता. या सरकारमध्ये ते परत अर्थमंत्री होताच त्यांनी ४० कोटी रुपयांची पुरवणी मागणी मंजूर करून निधी कोल्हापूर महानगरपालिकेला पाठवला आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच मागण्या मान्य
उपमुख्यमंत्री अजित पवार काही दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी शेतकरी प्रोत्साहन अनुदान आणि अंबाबाई मंदिर विकास आराखड्याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर दोन्ही मागण्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पूर्ण करू, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. उद्यापासूनच अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच या मागण्या मान्य केल्या असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.