छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांपैकी ४ लाख ६० हजार ८४० शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
माहितीनुसार, एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान अनुषंगाने कृषी व महसूल विभागामार्फत वेळोवेळी संयुक्त पंचनामे करण्यात आले. पंचनाम्यांच्या आधारे बाधित शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला व त्यानुसार निधीची मागणी करण्यात आली.
या मागणीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी शासनाने २० ऑक्टोबर व २९ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार आवश्यक निधी मंजूर केला.
अनुदान थेट खात्यात जमा
निधी मंजूर झाल्यानंतर सर्व संबंधित तहसीलदारांमार्फत तालुकानिहाय बाधित शेतकऱ्यांच्या याद्या ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचा अॅग्रीस्टॅक/फॉर्मर आयडी तयार झाला आहे, अशा बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट DBT पद्धतीने अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली.
शासनाने ४ नोव्हेंबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार खरडून गेलेल्या जमिनीसाठी ६ कोटी ७० लाख ६० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच रब्बी हंगामासाठी बियाणे व इतर अनुषंगिक खर्चासाठी प्रति हेक्टर १० हजार रुपये (कमाल ३ हेक्टरपर्यंत) मदत देण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.
शेतकरी संख्या व मदतीचा तपशील
- ० ते २ हेक्टर नुकसानग्रस्त शेतकरी: ६,४४,६४९
- २ ते ३ हेक्टर नुकसानग्रस्त शेतकरी: ४१,१३९
- एकूण नुकसानग्रस्त शेतकरी (० ते ३ हेक्टर): ६,८५,७८८
यापैकी
- ऑनलाइन पोर्टलवर अपलोड केलेल्या याद्या: ५,०७,७८०
- पोर्टलवर अपलोड करणे बाकी: १,७८,००८
ऑनलाइन याद्या अपलोड झालेल्या शेतकऱ्यांपैकी
- अॅग्रीस्टॅक/फॉर्मर आयडी पूर्ण असलेले व अनुदान मिळालेले शेतकरी: ४,६०,८४०
- ई-केवायसी अभावी प्रलंबित शेतकरी: ४६,९४०
ई-केवायसी करण्याचे आवाहन
ज्या शेतकऱ्यांचा अॅग्रीस्टॅक/फॉर्मर आयडी व ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, त्यांच्या खात्यात अनुदान जमा झालेले नाही. संबंधित शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.