शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) 16 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. हा हप्ता कधी जमा होणार याची तारीख सांगण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात 16 व्या हप्त्याचे पैसे हस्तांतरित करणार आहेत.
होळीपूर्वी करोडो शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होळीपूर्वी करोडो शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच भेट येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील हप्त्याचे पैसे वर्ग करण्यास सुरुवात करणार आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर पीएम किसानच्या अधिकृत हँडलवरून असे सांगण्यात आले की पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात 16 व्या हप्त्याचे पैसे हस्तांतरित करणार आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातून हस्तांतरित केला जाणार आहे. हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे हस्तांतरित केला जाणार आहे.
आतापर्यंत एकूण 15 हप्ते देण्यात आले
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण 15 हप्ते देण्यात आले आहेत. 15 वा हप्ता गेल्या 15 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला. नोव्हेंबरपासून एकूण 4 महिने उलटले आहेत. त्यामुळे फेब्रुवारीत हप्ता निघेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. तुमच्या हप्त्याची स्थिती जाणून घेण्यासाठी, तुम्ही PM किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटला https://pmkisan.gov.in/ ला भेट देऊन तपासू शकता. या वेबसाईवर PM किसान योजनेबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
2019 मध्ये भारत सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. तेव्हापासून केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 15 हप्ते जारी केले आहेत. योजनेअंतर्गत, भारत सरकार वर्षातून तीन वेळा 2000 चे तीन हप्ते जारी करते. म्हणजे एका वर्षात 6000 दिले जातात. आता शेतकऱ्यांना 16 व्या हप्त्याची प्रतीक्षा होती. पण आता 16 व्या हप्त्याची तारीख देखील निश्चित झाली आहे. पुढच्या आठवड्यात 28 फेब्रुवारीला PM किसानचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.