मालदीव मोठं की लक्षद्वीप, दोघांमध्ये काय आहे फरक Maldives and lakshadweep

Maldives and lakshadweep पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीपला जाऊन आल्यावर या चर्चा सुरू झाल्या. मालदीवमधल्या नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मालदीव सरकारनं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. भारतातही त्याबद्दल विविध स्तरांतून विशेषतः बॉलिवूडमधून तिखट प्रतिक्रीया उमटल्या. मालदीवऐवजी लक्षद्वीप आणि भारतीय पर्यटनस्थळांना भेटी द्याव्यात, असं आवाहनही करण्यात आलं; मात्र मालदीव आणि लक्षद्वीपची तुलना करणं योग्य नाही, असाही एक सूर या चर्चांमध्ये होता.

मालदीव हा स्वतंत्र देश आहे, तर लक्षद्वीप हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. भारतातून मालदीवला जाणं सोपं आहे, तसंच तुलनेनं कमी वेळात तिथे पोहोचता येतं. मालदीवला व्हिसा लागत नाही, पण लक्षद्वीपला जाण्यासाठी परमिट गरजेचं असतं. मालदीवला जाण्यासाठी भारतातून भरपूर फ्लाइट्स आहेत; पण लक्षद्वीपला फ्लाइट्स कमी आहेत. Maldives and lakshadweep

मालदीव

मालदीव भारताच्या नैर्ऋत्य दिशेला आहे. कोचीपासून मालदीव एक हजार किलोमीटर अंतरावर आहे. मालदीव या शब्दाचा अर्थ दिव्यांची माळ. 1968मध्ये हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून स्थापन झालं. मालदीव हा 1200 बेटांचा समूह आहे. बहुतांश बेटांवर कोणीही राहत नाही. त्याचं क्षेत्रफळ 300 चौरस किलोमीटर आहे. म्हणजेच दिल्लीपेक्षा अंदाजे 5 पट लहान. तिथे धिवेही आणि इंग्लिश भाषा बोलली जाते. तिथली लोकसंख्या अंदाजे 4 लाख आहे. हवामान बदलामुळे या बेटांना पाणी पातळी वाढण्याचा धोका आहे.

लक्षद्वीप

लक्षद्वीपपासून मालदीव 700 किलोमीटर अंतरावर, तर कोचीपासून 440 किलोमीटर अंतरावर आहे. हा 36 छोट्या-छोट्या बेटांचा समूह आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, तिथली लोकसंख्या अंदाजे 64 हजार आहे. त्यात बहुतांश म्हणजे 96 टक्के मुस्लीम धर्मीय आहेत. त्याचं क्षेत्रफळ 32 चौरस किलोमीटर आहे. म्हणजे मालदीवपेक्षा 10 पट कमी. तिथे मल्याळी भाषा बोलली जाते. फक्त मिनिकॉय या बेटावर मह्हे भाषा बोलली जाते. लक्षद्वीपमध्ये मासेमारी, नारळाच्या बागा हे उत्पन्नाचं साधन आहे. तिथे आता पर्यटन व्यवसायालाही गती मिळाली आहे.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या वर्षी लक्षद्वीपमध्ये अंदाजे 25 हजार पर्यटक गेले होते. मालदीवच्या तुलनेत ही संख्या 8 पट कमी आहे. कोचीमधून लक्षद्वीपसाठी दीड तासांचा विमानप्रवास करावा लागतो. अगाट्टी बेटावर विमानतळ आहे. तिथून इतर बेटांवर जाण्यासाठी बोटी किंवा हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध आहे. कोचीपासून जलमार्गानेही लक्षद्वीपला जाता येतं. अंदाजे 14-18 तासांचा हा प्रवास असतो. लक्षद्वीपमध्ये कवरत्ती आयलंड, लाइट हाउस, जेट्टी साइट-मशीद, बंगारम, थिन्नाकारा अगाट्टी ही काही प्रमुख पर्यटनस्थळं आहेत. लक्षद्वीपमध्ये मे ते सप्टेंबर हा काळ फिरण्यासाठी योग्य असतो; मात्र डिसेंबर ते फेब्रुवारीतही तिथे पर्यटकांची गर्दी असते. लक्षद्वीपला जाण्यासाठी एक परवानगी घ्यावी लागते. तिथल्या अनेक बेटांवर प्रवेश निषिद्ध आहे. काही ठिकाणी परवानगी घेऊन जाता येतं.

Leave a comment